

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : छावणी भागातील विद्यादीप बालगृहातील नऊ मुलींनी हातावर वार करून घेत पलायन केल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली होती. बालगृह व बाल कल्याण समितीवरही मुलींनी आरोप केले होते.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल सात दिवसांत येणार आहे. त्यानंतर हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्यच्या मुद्द्यावर निवेदन करताना मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती व इतर अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.१) संस्थेला भेट देत चौकशी केली. तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता.
त्यानंतर बालगृहातील नऊ मुलींनी पलायन केले होते, असे त्यांनी विधान परिषदेत सांगितले. या प्रकारानंतर सात मुलींना पोलिस व दामिनी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले. मात्र दोन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी सापडली असून एक मुलगी अद्यापही फरार आहे. पाच मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे
सभागृहात बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, त्या संस्थेतील अधीक्षक बदलण्यात आला आहे. बालगृह व्यवस्थापन व बालकल्याण समितीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.