

MP Sandipan Bhumre's driver will be investigated
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरचे जमीन बक्षीस प्रकरणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत महसूल सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत, असे गुरुवारी (दि.७) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. तक्रार आली म्हणजे चौकशी करावीच लागते, असेही ते म्हणाले.
धाराशिव येथील कार्यक्रमानिमित्त बुधवारी सायंकाळी मंत्री बावनकुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते शहरात मुक्कामी होते. सकाळी ते धाराशिवकडे रवाना झाले.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आल्यावर ईव्हीएम बिघडते आणि विरोधक जिंकले की ईव्हीएम चांगले ठरते, अशी विरोधकांची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे कुणीही उरले नाही.
मुंबई महापालिका हातातून जाण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे कार्यकर्ते थांबवायचे पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली भेटीवर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस व शिंदे यांच्यात रोज चर्चा होतात. दिल्लीत एनडीएचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांना भेटतात. शिंदे यांचा दिल्ली दौरा एनडीए नेता म्हणून झाला. रायगड पालकमंत्री पद येथेच सुटेल, दिल्लीचा हा विषय नाही.