

MP Sandipan Bhumre's driver thoroughly investigated by the Economic Crimes Branch
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खासदार संदीपान भुमरे आणि आ. विलास भुमरे यांच्याकडे चालक म्हणून काम करणारे जावेद शेख यांच्या नावावर सालारजंगची जालना रोडवरील दाऊदपुरा भागातील तब्बल १५० कोटींची जमीन हीबानामा (गिफ्ट) करून दिल्याचा प्रकार समोर आला होता. परभणी येथील वकील मुजाहिद खान यांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखाकडून चौकशी सुरू झाली आहे.
सोमवारी (दि.३०) सकाळी अकरा वाजता जावेद हे आर्थिक गुन्हे शाखेत हजर झाले. त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ३५ प्रश्न विचारले मात्र जावेद यांनी एकाचेही समाधानकारक उत्तर दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास बजावले आहे. दरम्यान, सालारजंगचे मीर महेमूद हे आजारी असल्याने चौकशीला आले नाहीत. दोन दिवसांत ते येणार असल्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.
मुजाहिद इकबालखान समीउल्लाखान (५२,रा. दर्गा रोड, परभणी) हे वकील आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वंशज मीर महेमूद अली खान यांच्या नावावर छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे कोट्यवधींची जमीन आहे. मीर महेमूद यांनी वकील मुजाहिद यांना दावा लढण्यासाठी ९० लाख ते १ कोटी रुपये घेतले व जमीन हिबानाम्याने (गिफ्ट डीड) देण्याचे ठरविले होते. मात्र, नंतर या जमिनीवर जावेद रसूल शेख नावाच्या व्यक्तीचा ताबा असल्याचे मुजाहिद यांना कळले.
जावेदने आपली ओळख भुमरे साहेबांचा चालक म्हणून सांगत, जमीन त्याच्या नावावर हिबानाम्याने करण्यात आल्याचे सांगितले आणि विरोध केल्यास धमकी दिली. हा हिवानामा ९ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला असल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मंत्रिपदाचा वापर करून स्टॅम्प ड्युटी बुडवून जमीन घेतल्याचा आर ोप मुजाहिद यांनी केला होता. जावेद यांनी पोलिस चौकशीसाठी दिलेल्या प्रश्नावलीला उत्तर देणे टाळत सुमारे दोन महिन्यांपासून चौकशीला आले नव्हते. दरम्यान, भुमरे यांनी मुजाहिद यांना जमिनीचा नाद सोड अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. जावेद शेख यांनी मात्र नवाब कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे जमीन मिळाल्याचे सांगत, भुमरे कुटुंबाचा यात काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, माध्यमांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी तपासाला पुन्हा वेग दिला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी जावेद यांची आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय मोहसीन सय्यद यांनी सुमारे ९ तास कसून चौकशी केली. सालारजंगचे मीर महेमूद यांनी कोट्यवधींची जमीन हिबानामा (गिफ्ट डीड) करून दिल्याचे जावेद यांचे म्हणणे आहे. मात्र, जावेद यांचे मीर महेमूद यांच्याशी कौटुंबिक नाते काय आहे? हीबानामा कोणत्या आधारावर झाला? तुम्हालाच जमीन कशी मिळाली? तक्रारदार यांच्या दाव्यानुसार जमीन त्यांना हीबानामा करून देण्यात आली होती तर पुन्हा तुमच्या नावे दुसरा हीबानामा कसा करण्यात आला? यासह तब्बल ३५ प्रश्न पोलिसांकडून विचारण्यात आले. मात्र, एकाचेही जावेद यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
हैदराबादमधील सालारजंग कुटुंबातील वंशजांपैकी मीर महेमूद अली खान यांच्या कुटुंबाची छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडीरेकनर दरानुसार कोट्यवधी किमतीची जमीन आहे. सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते. मीर महेमूद यांनी जमीन खा. भुमरे यांचे चालक जावेद आणि वकील खान अशा दोघांच्या नावे हीबानामा करून दिली. त्यामुळे कोणाचा हीबानामा खरा किंवा अगोदर झाला, हे मीर महेमूद यांच्या चौकशीतच समोर येऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.