

Inquiry into distribution of labor materials
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या साहित्य वाटपाची सखोल चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. चौकशी समितीने आता साहित्य वाटप झालेले कामगार खरोखरच बांधकाम कामगार आहेत की नाही याची खातरजमा करण्यासाठी लाभार्थीच्या याद्या तहसील आणि पंचायत समिती स्तरावर सुपूर्द केल्या आहेत.
शासनाकडून महाराष्ट्र घरेलू कामगार महामंडळाअंतर्गत संसारोपयेगी साहित्य वाटपाची योजना राबविण्यात येते. मात्र यात प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी २५ मे रोजी केला होता. बोगस याद्या बनवून, खऱ्या लाभार्थीशिवाय इतरांची नावे समाविष्ट करून हा घोटाळा केला जात आहे. यात अधिकारी आणि एजंटही सहभागी आहेत, असा आरोपही शिरसाट यांनी केला होता.
तसेच या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली या साहित्य वाटपाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून अप्पर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या नेतृत्वाखालील ही समिती चौकशीचे काम करत आहे. समितीने कामगार उपायुक्त कार्यालयाकडून नोंदणी झालेल्या लाभार्थीच्या याद्या मागवून घेण्यात आल्या. या याद्या आता लाभार्थीची खातरजमा करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. आता तहसील आणि पंचायत समितीस्तरावरून या याद्यांमधील लाभार्थी खरोखरच बांधकाम कामगार आहेत का हे तपासले जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. त्यापैकी १ लाख ५२ हजार लाभार्थ्यांना आतापर्यंत संसारोपयोगी साहित्याचे वाटप झालेले आहे. उर्वरित साहित्य वाटप तूर्तास थांबविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.