

Mokka on drug mafia Ashpak Patel's gang
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात एमडी ड्रग्ज आणि गुंगीकारक औषधांची तस्करी करून तरुण पिढीला नशेच्या खाईत लोटणाऱ्या अशपाक पटेल ऊर्फ शेख अशपाक शेख इसाक याच्या ड्रग सिंडिकेटला मोक्कांतर्गत कारवाई करत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मोठा दणका दिला आहे.
जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे सपोनि विनायक शेळके व त्यांच्या पथकाने शहाबाजार येथील रवींद्र कॉलनीत शेख कलीम याच्या घरावर मारलेल्या छाप्यात एमडी ड्रग्ज, मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल सापडला होता.
त्यानंतर, अविनाश पाचोंदे याच्या घरातून त्याची पत्नी अनिता हिच्या ताब्यातून गुंगीकारक सिरपच्या ७५६ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईची कुणकुण लागताच टोळीप्रमुख अशपाक पटेल अटकेच्या भीतीने पसार झाला होता. तो नाशिकच्या हॉटेल सॅफ्रॉनमध्ये लपल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या होत्या. या संपूर्ण कारवाईत
तब्बल ३८ लाख ७९ हजार रुपयांचे ड्रग्ज व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, अशपाक हा ड्रग्जच्या काळ्या पैशांच्या देवाणघेवाणीसाठी आपली मैत्रीण इशरत अकीब शेख हिच्या बँक खात्याचा वापर करत होता. या खात्यावरून गेल्या वर्षभरात लाखांचे व्यवहार झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत अशपाक आणि इतर १३ आरोपींचे बँक खाते गोठवले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास छावणी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त भागीरथी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर पॅटर्नची चर्चा
शहरातील नशेखोरी हद्दपार करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी धडक कारवाया सुरु केल्या. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये अजय ठाकूरच्या ड्रग सिंडिकेटवर देखील मोक्का लावला. ड्रग्ज सिंडिकेटवर मोक्काच्या कारवाया राज्यात क्वचितच असल्याने संभाजीनगर पोलिसांच्या पॅटर्न चर्चा आहे. अशपाक टोळीतील या १५ आरोपींसोबतच आणखी ८ जणांना मोक्कामध्ये आरोपी केले जाणार आहे