

Mobile hacked by clicking on APK file; Doctor's wife loses Rs 2.5 lakh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाशिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी गुगलवर कंपनीचा नंबर सर्च करून कॉल करणे डॉक्टर पत्नीला चांगलेच महागात पडले. सायबर भामट्याने एपीके फाईल पाठवून त्याद्वारे बँक खात्यातून २ लाख ६३ हजार ७८८ रुपये लंपास केले. हा प्रकार १७ सप्टेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास एन-३ सिडको भागात घडला.
फिर्यादी आरती महेंद्र सोनुने (२८, रा. अस्मिता अपार्टमेंट एन-३) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची वाशिंग मशीन एक महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामुळे त्यांनी १२ सप्टेंबरला दुपारी दुरुस्तीसाठी गुगलवर सॅमसंग सर्व्हिस असे टाकले. वेबसाईडवर क्लिक केल्यानंतर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला.
तेव्हा समोरच्याने मी दुसऱ्या नंबरवरून कॉल करतो, असे सांगून फोन करून वाशिंग मशीनबाबत विचारणा करून रिपयर सर्व्हिस नावाची एपीके फाईल पाठवली. त्यावर क्लिक केल्यानंतर आरती यांनी नाव, पत्ता अशी माहिती भरली. त्याने ५ रुपये पेमेंट करण्यास सांगितल्याने फोन पेवर पेमेंट करताना ते झाले नाही.
भामट्याने पुन्हा कॉल करून ते पेमेंट मी करतो, तुम्ही मशीन दुरुस्तीसाठी मी घरी आल्यावर मला परत करा, असे म्हटले. त्याने मोबाईल हॅक करून तासाभरात बँक खात्यातून १ रुपया क्रेडिट, डेबिट केला. त्यानंतर दीड तासात पाच टप्प्यांत २ लाख ६३ हजार ७८८ रुपये लंपास केले. आरती यांनी तात्कळ एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दिली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.७) गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.