

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहारांची विविध प्रकरणे बाहेर काढली होती. सध्या त्यांच्या एक नाही, दोन नाही तर तीन तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा दावा माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बुधवारी (दि.८) केला.
विरोधी पक्षांकडून मध्यंतरी मंत्री शिरसाठ यांच्या विरोधात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून या प्रकरणांचा पाठपुरावा बंद झाल्याचे चित्र आहे. याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, "आम्ही मंत्री शिरसाट यांचे विविध प्रकरणे बाहेर काढली होती. त्यावर राज्य सरकारने आम्हाला चौकशीचे आदेश दिले होते. माझ्या माहितीनुसार सध्या त्या प्रकरणात चौकशा सुरू आहेत. एक नाही दोन नाही तर सध्या शिरसाठ यांच्या तीन चौकशी सुरू आहेत. म्हणूनच ते गप्प आहेत अन्यथा ते दररोज सकाळी बोलत होते, आता त्यांचे बोलणे बंद झाले आहे", असेही दानवे म्हणाले.
तीन तीन चौकश्या सुरू असल्याचा दानवे यांनी केलेला दावा मंत्री संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. दानवे हे सध्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले.