

Leaders from Ajit Pawar's own party are against him; Jarange's allegations
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेतेच मराठा समाजाच्या विरोधात करतात. काम सगळीकडून उठतात आणि बीडमध्ये मोर्चा काढतात. नेते तेच आणि पदाधिकारी त्यांचेच, तुम्ही साप पोसले आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी केला. एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा दावाही त्यांनी केला.
जरांगे यांना बुधवारी (दि.८) दुपारी गॅलेक्सी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते अंतरवली सराटीकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार टीका करत मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले आम्ही ओबीसींना आमचे लहान भाऊ समजायचो, परंतु यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शतूत्वाची भूमिका पार पाडायला लागलेत.
मात्र मराठ्यांचे वेळेवर डोळे उघडले. त्यामुळे मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. मराठ्यांना आता जीआरसाठी लढावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच डॉक्टरांनी आराम सांगितला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवार अंतरवाली सराटी येथे लोकांना भेटणार असल्याचेही जरांगे म्हणाले.
जिल्ह्यात आरक्षणासाठी झालेल्या आत्महत्या प्रकरणांत चिठ्ठ्या मप्लांटफ केल्याचे तपासात समोर आल्याच्या माहितीवर जरांगे यांनी शंका व्यक्त केली. कोणाच्या भावनांशी, दुःखाशी आपण खेळू शकत नाही. मी याचे समर्थन करत नाही. मात्र छगन भुजबळांसारखे काही ओबीसी नेते सध्या खालच्या थराला गेले आहेत. अधिकाऱ्यांवर दडपण आणून असले प्रकार केले जातात. पोलिसांचा तपास दबावापोटी असू शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
मंत्री छगन भुजबळ यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करत जरांगे म्हणाले, भुजबळाचा विषय आता संपला असून, तो म्हातारपणामुळे वेडा झाल्यासारखा बोलत आहे. मराठ्यांचा जीआर निघाल्यापासून भुजबळ पिसाळलेला कुत्र्यासारखा झाला आहे, असे म्हणत त्यांनी भुजबळांच्या टोळीमुळे दंगल घडवली जाऊ शकते, असा आरोपही केला. तू औरंगजेब होऊन इथेच मरणार, तुझे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी जहरी टीकाही त्यांनी मंत्री भुजबळांवर केली आहे.