MJP Investigation : गैरव्यवहाराची चौकशी दूरच; समितीवरून अधिकाऱ्यांत जुंपली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील : अधीक्षक अभियंतांनी नेमलेली समिती मुख्य अभियंतांनी केली रद्द
Fund
MoneyPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या कार्यालयातील एका कनिष्ठ लिपिकाच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून मुंबईतील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. यावरून अधीक्षक अभियंता दीपक कोळी यांनी समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले. परंतु मुख्य अभियंता पलांडे यांनी चौकशी समिती रद्द करून कोळी यांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे चौकशी होण्यापूर्वीच नियुक्त केलेल्या चौकशी समितीवरून मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यामध्ये जुंपली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळ कार्यालयातील लाखोंचा आर्थिक गैरव्यवहार सध्या चर्चेत आहे. एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या दालनात कार्यरत अस लेले कनिष्ठ लिपिक अरुण गाडेकर यांच्यावर या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Fund
Marathwada Water Resources Department : जलसंपदाचे अधिकारी चौकशी समितींनाही जुमानेनात

यात बदल्या, पदभार आणि इतर प्रशासकीय कामकाजाबाबतच्या कामांसाठी आपल्याच विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठांच्या नावाने पैशाची मागणी करीत असल्याच्या तक्रारींचा समावेश आहे. हा प्रकार मागील दीड वर्षामध्ये अधिकच वाढल्याने कर्मचाऱ्यांनी याबाबत एमजेपीच्या नांदेड येथील मुसवीर जहां यांनी मुंबईतील कार्यालयाकडे तक्रार केली. त्यासोबतच एका लोकप्रतिनिधींकडेही माहिती दिली.

या गंभीर प्रकाराबाबत लोकप्रतिनिधींनी यांनी मुंबईतील एमजेपीचे मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी १५ मे २०२६ रोजी संभाजीनगरातील एमजेपीच्या मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून समिती गठित करणे आणि चौकशी करणे, असे लेखी पत्राद्वारे आदेशित केले होते. परंतु वरिष्ठांच्या आदेशानंतरही मुख्य अभियंता यांनी समिती गठित करून चौकशी सुरू केली नाही.

Fund
Iirrigation department corruption : स्पर्धा वाढली की, निविदा होतात रद्द

मुख्य अभियंतासोबतच अधीक्षक अभियंता यांनाही आदेश प्राप्त झाले होते. त्यावरून अधीक्षक अभियंता कोळी यांनी समिती गठित करून चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार चौकशी समितीचे कामकाज सुरू होणार त्या अगोदरच मुख्य अभियंता पलांडे यांनी अधीक्षक अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावून चौकशी समिती रद्द केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे चौकशी तर दूरच अधिकाऱ्यांमध्येच जुंपली आहे.

ऑनलाईन स्वीकारले पैसे

आस्थापना विभागाशी संबंधित कामांसाठी वरिष्ठांच्या नावाने पैशाची मागणी होत आहे, अशी तक्रार नांदेड शहर प्रतिनिधी मुसवीर जहां यांनी २० मार्च २०२६ रोजी वरिष्ठांकडे केली. हे पैसे ऑनलाईन घेतले जाते, असे तक्रारीत नमूद आहे. तसेच चौकशी समिती नियुक्त होताच अनेकांनी तक्रारींसह ऑनलाईन पैसे पाठविल्याचा रेकॉर्ड समितीकडे सादर केल्याची चर्चा आहे. त्यात सुमारे १५ लाख रुपयांचा व्यवहार पुढे आल्याची चर्चा आहे.

आमदार जैस्वाल यांचे पत्र

एमजेपीतील कनिष्ठ लिपिकाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी अधीक्षक अभियंता दीपक कोळी यांनी सुरू केली होती. परंतु ही समिती चौकशी सुरू होण्याअगोदरच मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी रद्द केली. हा प्रकार अयोग्य असून, यात मुख्य अभियंता यांचे नाव पुढे येण्याची भीती असल्यानेच चौकशी रद्द केली असावी, असे आमदार जैस्वाल यांनी एमजेपीच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news