

Misappropriation of Rs 16 crore loan of Sant Eknath factory
पैठण, पुढारी वृत्तसेवा : श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाच्या नावाखाली मालमत्ता गहाण ठेवत १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी सचिन घायाळ शुगर्सचे चेअरमन सचिन घायाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सचिन घायाळ यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणासाठी ऊस उत्पादक व सभासद मालक असलेल्या श्रीसंत एकनाथ साखर कारखान्याची मालमत्ता तारण, गहाणखत करून बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ३० कोटींचे कर्ज घेतले. कर्ज कारखान्यासाठी न वापरता दिशाभूल केली.
या घोटाळ्याचा प्रकार २५ ऑगस्ट २०२१ ते आतापर्यंत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात सचिन घायाळ यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास एमआयडीसी सपोनि ईश्वर जगदाळे करीत आहेत.
कर्ज रकमेचा विनियोग इतरत्र
कर्ज प्रकरण करताना जाणीवपूर्वक खोटे व दिशाभूल करणारी कागदपत्रे जोडून श्रीसंत एकनाथ साखर कारखान्याच्या सभासद ऊस उत्पादकांचा विश्वासघात करून फसवणूक केली. कर्ज जमा रकमेचा विनियोग इतरत्र करून १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार व गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.