

Encroachment on Ram temple site in Siddhapur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा गंगापूर तालुक्यातील सिद्धपूर येथे श्री राम मंदिरासाठी दान मिळालेल्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.२७) तहसील प्रशासनाला निवेदन देत सदर अवैध बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी केली.
ग्रामस्थांनी नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील एका व्यक्तीने मिळकत क्र. १२० च्या दस्त नोंदणीत फेरफार करून मिळकत क्र. ३२ व ३३ या मंदिरासाठी नियोजित जागेवर ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता अतिक्रमण केले आहे. संबंधित जागा श्री राम मंदिरासाठी दानस्वरूपात मिळालेली असून, तेथे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे मंदिरासाठी आण-लेल्या विटांचाही अनधिकृत वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात २३ फेब्रुवारी रोजी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. या प्रकारामुळे गावातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
तहसील प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अनधिकृत बांधकाम हटवावे, अन्यथा सोमवारपासून (दि. २) सिद्धपूर गावात सर्व ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.