Drought Review Meeting : काजू- बदामावर ताव मारत मराठवाड्याच्या दुष्काळावर चर्चा

कृषिमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड : नांदेडमध्ये आढावा बैठक
Drought Review Meeting : काजू- बदामावर ताव मारत मराठवाड्याच्या दुष्काळावर चर्चा
Published on
Updated on

Minister discusses Marathwada's drought while feasting on cashews and almonds

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना आणि शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, कृषिमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचा असंवेदनशील चेहरा शनिवारी (दि.१९) समोर आला, नांदेड येथे आयोजित बैठकीत या नेत्यांनी चक्क काजू-बदामांवर ताव मारत मराठवाड्याच्या दुष्काळाचा आढावा घेतला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून कृषिमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठली. या प्रकाराने वसमत तालुक्यात संतापलेल्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना थेट काजू-बदामाची भेट देत आपला रोष व्यक्त केला.

Drought Review Meeting : काजू- बदामावर ताव मारत मराठवाड्याच्या दुष्काळावर चर्चा
Mantha Taluka : मंठा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा

दरम्यान, या प्रकरणावरून खासदार बंडू जाधव हे उलट प्रश्न विचारणाऱ्यावर पत्रकारांवरच भडकले, तर कोणत्या बैठकीत काय खायला ठेवावे, याचे अधिकाऱ्यांना भान असावे. अधिकाऱ्यांच्या अक्कलशून्य कारभारामुळे आमची बदनामी होत असल्याचे सांगत मंत्री संजय शिरसाट यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठक पार पडली. या बैठकीला परमणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यासह अनेक प्रमुख लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एकीकडे पावसाअभावी पीक करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा आहे, बळिराजाच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. अशा गंभीर परिस्थितीत नांदेड येथील बैठकीत दुष्काळावर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचे लक्ष मात्र समोर ठेवलेल्या काजू-बदामांवर होते. लोकप्रतिनिधींनी या सुकामेव्यावर मारलेल्या डल्ल्याचा व्हिडिओ बैठकीतील काहींनी टिपला आणि तो अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या या वर्तनामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Drought Review Meeting : काजू- बदामावर ताव मारत मराठवाड्याच्या दुष्काळावर चर्चा
Sand smuggling : पैठणमध्ये अवैध वाळू वाहतूक तस्करांवर एलसीबीची कारवाई, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

समोर ठेवल्यावर कोणी खात नाही का? : खा. जाधव

बैठक संपल्यानंतर पत्रकारांनी या व्हायरत्न व्हिडिओबाबत परभणीचे खासदार बंडू जाधव यांना जाब विचारला असता, ते पत्रकारांवर चांगलेच भडकले. समोर ठेवल्यानंतर कोणी खात नाही का?, असा अजब आणि बेजबाबदार युक्तिवाद करत त्यांनी या प्रकाराचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, नांदेडमध्ये तब्बल ४ तास ७६ तालुक्यांची आढावा बैठक चालली. मी जागेवरून उठलो नाही आणि माझ्यासमोर काजू-बदाम आले नाहीत. जर कुणी ते खाल्ले असतील, तर ते कदाचित मधुमेहाचे (शुगरवे) रुग्ण असू शकतात. विरोधकांनी आरोग्यावरून घाणेरडे राजकारण करू नये. मात्र, आढावा बैठकीत असा प्रकार घडणे चुकीचे होते, अशी कबुलीही त्यांनी दिली.

टीकेनंतर कृषिमंत्र्यांची थेट बांधावर बेसन-भाकरीची पंगत !

या तीव्र संतापानंतर आपली मलीन झालेली प्रतिमा सावरण्यासाठी (डॅमेज कंट्रोल) कृषिमंत्र्यांनी तातडीने साधेपणाचा आव आणल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली जिल्ह्यातील हिवरा गावात दुष्काळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भरणे यांनी चक्क शेताच्या बांधावर बसून 'बेसन-भाकरी'चा आस्वाद घेतला. गावातील नुकसानीची पाहणी आटोपल्यानंतर त्यांनी थेट शेतातच जेवणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, यावेळी केवळ मंत्रीच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाही बांधावर खाली बसून भाजी-भाकरी खाताना दिसली.

वसमत येथे संतप्त शेतकऱ्यांकडून कृषिमंत्र्यांना काजू-बदामाची भेट

नांदेडमधील सुकामेव्याच्या मेजवानीचे पडसाद थेट हिंगोली जिल्ह्यात उमटले. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथे दुष्काळ पाहणीसाठी आलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी अडवला. बैठकीत सुकामेवा खाऊ घातल्याच्या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी थेट भरणे यांनाच 'काजू-बदाम' भेट देऊन आपला संताप व्यक्त केला. 'काजू-बदाम खायेंगे, दुष्काळ दौरा करेंगे' अशा घोषणा देत तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या दौऱ्यात आमदार राजू नवघरे आणि खासदार रामराव वडकुते हेही उपस्थित होते.

अधिकाऱ्यांचा अक्कलशून्य कारभार : संजय शिरसाट

या वादावर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शेतकरी संकटात असताना दुष्काळावरील बैठकीत अधिकारीच काजू-बदाम आणून ठेवतात. उद्या कोणाच्या अंत्ययात्रेतही हे काजू-बदाम आणून ठेवतील. अधिकाऱ्यांच्या अशा अक्कलशून्य कारभारामुळे बदनामी मात्र आमची होते, असा संताप शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news