

Minimum temperature drops, mercury at 10 degrees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरातील किमान तापमानाचा पारा गेल्या दोन दिवसांत चांगलाच घसरला असून, हुडहुडी भरवणारी थंडीत वाढ झाली आहे. चिकलठाणा वेधशाळेने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी (दि.८) शहराचा किमान पारा तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यंदा आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ-उताराची मालिका सुरूच असून, थंडीचा कडका वाढला असल्याने शहरवासीयांकडून शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. शहर व परिसरात गेल्या होता. मात्र गेल्या दोन आठवडाभरात थंडी गायब झाल्याने उन्हाचा चटका वाढला दिवसांपासून अचानक गारवा वाढल्याने बोचरी थंडी जाणवत आहे. दरम्यान, आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे असल्याने सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होत आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात तीन ते चार अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवेत ओलावा कमी व वाऱ्याचा वेग मंद असल्याने रात्रीचा गारवा अधिक वाढला आहे. केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. काही भागांत पहाटेच्या धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घसरण होऊ शकते. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारी शहरात किमान तापमान ३०.४ तर किमान तापमान १०.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, यंदाचे हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान तज्ज्ञांकडून मानले जात आहे. यावरून आता रात्री वाढणारा गारवा आणि पहाटेच्या थंड हवेत वाढ होणार असून, नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कडाक्याच्या थंडीचा इशारा
हवामानात अचानक बदल झाल्याने मागील आठवड्यात थंडी गायब झाली होती. आता वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवत असून, सकाळच्या धुरकट प्रकाशात, मंद गार वाऱ्यात आणि रात्री थंड हवा वाढत आहे. किमान तापमानातील आजची लक्षणीय घट हा कडाक्याच्या थंडीचा इशारा मानला जात आहे.