

Mercury Crosses the 40-Degree Mark Again; City Residents Tormented by the Heat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा उन्हाचा तडाखा वाढला असून पारा पुन्हा चाळीस अंशांच्या पार गेला आहे. रविवारी (दि.१०) शहरातील किमान तापमान ४२. ४ तर किमान तापमान २६.१ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. अचानक उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले असून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
वाढत्या उन्हापासून गेल्या आठवडाभरात थोडाफार दिलासा देणाऱ्या वातावरणानंतर रविवारी शहरातील तापमानात पुन्हा वाढ झाली. सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढू लागल्याने दुपारी उकाड्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले. गरम व दमट वातावरणामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे चित्र शहरभर दिसून आले.
दरम्यान एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मेच्या सुरुवातीला शहरात सलग २३ दिवस तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. मात्र ४ मेपासून तापमानात काहीशी घट झाली होती. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला होता. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या खाली असले तरी किमान तापमान कायम जास्त राहत असल्याने रात्रीदेखील उकाडा जाणवत आहे. तसेच येत्या काही दिवसांत तापमान पुन्हा ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रस्त्यांवर शुकशुकाट
उन्हाचा चटका वाढल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही दिसून आला. रविवारी दुपारच्या वेळी निराला बाजार, संभाजीपेठ, रेल्वेस्टेशन परिसर, क्रांतीचौक, जालना रोड आदी प्रमुख रस्त्यांवर नेहमीची वर्दळ कमी दिसली. कडक उन्हामुळे नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळल्याचे चित्र अनेक भागांत पहायला मिळाले.