

May's heat wave in March, temperature will reach 39 degrees today and tomorrow
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात यंदा उन्हाळ्याची झळ अपेक्षे पेक्षा खूपच लवकर आणि तीव्रतेने जाणवू लागली असून, मार्चच्या पहिल्याच आठवड्यात नागरिकांना मे महिन्यातील उन्हाच्या चटक्याची अनुभूती येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज आणि उद्या (९ व १० मार्च) तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगरकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून, दररोज सरासरी एक अंशाने पारा वर चढत आहे. सध्या शहरातील कमाल तापमान ३८ अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. विशेषतः दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीत उन्हाचा तडाखा सर्वाधिक जाणवत असल्याने शहरातील प्रमुख रस्ते ओस पडू लागले आहेत. कमाल तापमानासोबतच किमान तापमानातही वाढ झाली असून, पारा २१.४ अंशांवर पोहोचल्याने रात्रीचा गारवा गायब होऊन उकाडा वाढला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनोचा प्रभाव आणि वाळवंटी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे तापमानात ही झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, १२ आणि १३ मार्च रोजी शहरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात किंचित घट होऊ शकते, उष्णतेची तीव्रता कमी होण्याची चिन्हे नसल्याचे संकेत आहेत.
उष्माघातापासून असा करा बचाव...
दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा स्कार्फचा वापर करावा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्यावे.
उष्माघाताची लक्षणे (चक्कर येणे, मळमळणे) जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.