

Massive fire breaks out in complex due to short circuit in Gangapur
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शहरातील खंडोबा मंदिराजवळील ऐश्वर्या कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवार (दि.३१) रात्री ९ वाजे दरम्यान भीषण आग लागून राधाकृष्ण फुटवेअर हे दुकान जळून खाक झाले. या आगीत दुकानातील सर्व मालसामान व फर्निचर पूर्णतः नष्ट झाले असून, अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या मालकीच्या या कॉम्प्लेक्समध्ये तळमजल्यावर तीन व वरच्या मजल्यावर दोन दुकाने आहेत. तळमजल्यावरील रवींद्र विठ्ठलराव उदमले यांच्या राधाकृष्ण फुटवेअर दुकानात रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. दरम्यान, पावसामुळे ग्राहक कमी असल्याने उदमले यांनी दुकान आठ वाजताच बंद केले होते.
त्यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र काही वेळाने वीज आल्यानंतर अचानक शॉर्टसर्किट होऊन लाग लागली, अशी माहिती शेजारील दुकानदारांनी दिली. आग लागल्याचे समजताच शेजाऱ्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. माजी नगराध्यक्ष जाधव यांनी खासगी टँकर बोलावला, परंतु तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. नगरपालिकेच्या अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीमुळे संपूर्ण दुकान राखेत परिवर्तित झाले, मात्र शेजारील फर्निचर व सलून दुकाने अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले.
अनेक दुकानांचे नुकसान
चप्पल दुकानाच्या बाजूला असलेल्या बाळू शिंदे यांच्या सलून दुकानालाही या आगीची झळ बसून त्यातील किमती साहित्य जळाले. तर वरच्या मजल्यावर असलेल्या अमोल मुंदडा यांच्या साडीच्या व त्यांच्या बाजूला असलेल्या आनंद पाटील यांच्या सराफा दुकानाच्या पाट्या या जळून दोन्ही दुकानांच्या शटरचे नुकसान झाले. नागरिकांच्या मदतीने रात्री १०च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक कुमारसिंह राठोड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.