

Laptop, mobile, credit cards, documents seized in search of Bhavik Patel's house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांना टॅक्स चोरीच्या धमक्या देऊन कारवाईच्या धाकावर हजारो डॉलर्स उकळणाऱ्या सिंडिकेटचा प्रमुख आरोपी भाविक पटेलच्या सिंधी कॉलनी येथील इमारतीत पोलिसांनी शुक्रवारी (दि.३१) झाडाझडती घेतली. यात लॅपटॉप, मोबाईल, क्रेडिट कार्ड्ससह अनेक महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.
दरम्यान, अमेरिकन तपास संस्था एफबीआयचे दिल्ली येथील कार्यालयातील अधिकारी थेट शहर पोलिसांच्या संपर्कात आहेत. त्यांना ईमेल करून लवकरच फसवणूक झालेल्या अमेरिकन नागरिकांची माहिती मागविण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितले. एफबीआयच्या मदतीनेच हा तपास पुढे जाणार आहे.
अधिक माहितीनुसार, अमेरिकेतील नागरिकांना टॅक्स चोरी, लोन फ्रॉडमध्ये नाव आल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून गिफ्ट कार्डच्या माध्यमातून कोड रिडिम करून डॉलरची रक्कम बिटकॉइन आणि त्यानंतर रुपयांत रूपांतरित करून लूट केली जात होती. याचा प्रमुख जॉन हा व्हर्चुअली टोळीशी जोडलेला होता. इथे फारुख ऊर्फ फारुकी प्रमुख होता.
त्याला गुजरातचे भाविक पटेल, सतीश लाडे, भावेश चौधरी, वलय व्यास, अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी हे साथीदार होते. ११४ हून अधिक नॉर्थ ईस्टच्या तरुण-तरुणींना कॉलिंगसाठी कामावर ठेवण्यात आले होते. अमेरिकन इंग्लिश बोलण्याचे प्रशिक्षणही दिले होते. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २८) रॅकेटचा पर्दाफाश करून ११४ जणांना ताब्यात घेतले होते. पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, डीसीपी रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
तीन मजली इमारतीत ५० जणांची सोय
सिंधी कॉलनी येथे प्लॉट क्र. ५६ येथील तीन माळ्यांची इमारतच फारुकीने भाड्याने घेतली होती. यात २० हून अधिक खोल्या असून, गुजरातचा प्रमुख आरोपी भाविक पटेल हा नॉर्थ ईस्टच्या ४० ते ५० कर्मचाऱ्यांना घेऊन राहत होता. या इमारतीत शुक्रवारी पथकाने झाडाझडती घेतली. यात भाविकचा पासपोर्ट, तीन ते चार आधार कार्ड, ७ ते ८ क्रेडिट कार्ड यासह महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत.
सिंडिकेटचा मास्टरमाइंड गुजरातमध्ये ?
फारुकी हा स्थानिक असल्याने त्याला तो सर्वात पुढे होता. तोच कॉल सेंटरची सर्व व्यवस्था पाहत होता. मात्र त्याला मदतीला गुजरातची टीम होती. त्यात भाविक पटेल हा प्रमुख असून, तो गुजरातच्या फंडिंग करणाऱ्या मास्टरमाइंडच्या थेट संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कॉल सेंटर सिंडिकेटच्या मुळापर्यंत तपास होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.