Sambhajinagar Crime News : विवाहितेची गळा चिरून हत्या; आरोपीला जन्मठेप
Married woman murdered by slitting her throat; Accused gets life imprisonment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका विवाहितेची गळा चिरून हत्या करण्यात आली. प्रकरणात आरोपी शुभम भाऊसाहेब बागुल (२८, रा. सिद्धार्थनगर, एन-१२ हडको) याला जन्मठेप व २० हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.डी. खेडेकर यांनी गुरुवारी (दि.२२) ठोठावली.
प्रकरणात मृत सुनंदा शिवाजी वाघमोडे (रा. डी सेक्टर, एन-१२ हडको) हिची मावशी शारदा बाबासाहेब वाहुळ यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, सुनंदा व शुभम यांच्यात घटनेच्या पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यापूर्वी शुभमने प्रेमाचे आमिष दाखवून सुनंदाला पळवून नेल्याची तक्रारही तिच्या नातेवाईकांनी हसूल पोलिस ठाण्यात दिली होती.
मात्र दोघांचे परस्पर संमतीने संबंध असल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, काही महिन्यांपासून दोघे एन-१२ हडकोतील सिद्धार्थनगर परिसरात एकत्र राहत होते. मात्र शुभमला दारूचे व्यसन असल्याने तो सुनंदाचा छळ करीत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून सुनंदाने शुभमला सोडून आपल्या दोन मुलांसह एन-१२ हडको येथे किरायाने राहत होती. तरीही शुभम तिचा पाठलाग करत वारंवार त्रास देत होता.
६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शुभम सुनंदाच्या घरी गेल्यानतंर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात शुभमने कटरने सुनंदाचा गळा चिरून हत्या केली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तत्कालीन उपनिरीक्षक सी. व्ही. ठुबे यांनी दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात आरोपीच्या हाताचे ठसे, मृत सुनंदा हिच्या गळा २७ सेमी कट झालेला होता, तर कटरची अर्धी ब्लेड गळ्यात अडकलेली असल्याची डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे खून करून पळताना आरोपीला पाहणाऱ्या तीन साक्षीदार महिला फितुर झाल्या. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार बी.ए. बोर्डे, सुनील जाधव यांनी काम पाहिले.

