

The municipal elections are on the 15th, so why is the 14th date displayed on the EVM?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेसाठी मतदान १५ ला होते, ईव्हीएमवर १४ तारीख कशी, अशी विचारणा राज्य निवडणुक आयोगाकडून मनपा आयुक्तांकडे करण्यात आली असून त्यासंबधीचे पत्रही पाठवण्यात आले आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ ची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनवर मतदान दिनांक १४ जानेवारी असा दिसून आल्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची राज्य निवडणुक आयोगाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे.
यांसदर्भात भाकपचे राज्य सेक्रेटरी अॅड. सुभाष लांडे यांनी १६ जानेवारी रोजी दाखल केलेली तक्रार १९ जानेव ारीला निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाली. त्या अनुषंगाने तहसीलदार डॉ. भक्ती देवकाते यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून वस्तुस्थितीदर्शक सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान भाकपच्या महापालिका तक्रारीनुसार, निवडणुकीसाठीची प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ ची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनवर मतदान दिनांक १४ जानेवारी असा दिसून आला.
प्रत्यक्षात शहरात मतदान १५ जानेवारी रोजी पार पडले होते. त्यामुळे मतदानाच्या आधीच ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच याबाबत प्रभाग १६ मधील भाकपचे उमेदवार कॉम्रेड अॅड. अभय टाकसाळ यांनी अधिकृत तक्रार दाखल करत निकाल जाहीर न करण्याची व फेरमतदान घेण्याची मागणी केली आहे. याचप्रमाणे इतर काही उमेदवारांनीही आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणामुळे निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.