

A home finance collection manager embezzled 9 lakh rupees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा कर्जाचे हप्ते भरण्याच्या नावाखाली एका महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अॅस्पायर होम फायनान्स कंपनीच्या तत्कालीन कलेक्शन मॅनेजरने संगनमत करून कंपनीच्या नावे असलेला डिमांड ड्राफ्ट (डीडी) स्वतःच्या फायद्यासाठी वापरून महिलेची फसवणूक केली. हा प्रकार ४ मे २०२३ ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शहानगर कॉलनी, बीडबायपास भागात घडला. भारत गायकवाड आणि त्याने पाठवलेला बुलेटस्वार व्यक्ती अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी शहानगर परिसरातील रहिवासी अमिनाबी सलीम शेख (४९, रा. एसके प्राईड, बीडबायपास) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी २०१७ मध्ये सातारा परिसरातील एस. के. प्राईड इमारतीत एक फ्लॅट खरेदी केला होता.
त्यासाठी त्यांनी अॅस्पायर होम फायनान्सकडून १४ लाख ८० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. २०१९ पर्यंत त्यांनी नियमित हप्ते भरले, मात्र कोरोना काळात आर्थिक ओढाताण झाल्यामुळे काही हप्ते थकीत राहिले. या थकीत हप्त्यांच्या वसुलीसाठी कंपनीचा कलेक्शन मॅनेजर भारत गायकवाड याने अमिनाबी यांच्याकडे तगादा लावला होता.
घरापर्यंत येऊन शिवीगाळ व मानसिक त्रास दिल्याने, अखेर घाबरलेल्या अमिनाबी यांनी तडजोड करून ४ मे २०२३ रोजी ९ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट अॅस्पायर होम फायनान्सच्या नावाने तयार केला.
भारत गायकवाड याच्या सांगण्यावरून, अमिनाबी यांच्या भावाने हा ९ लाखांचा डीडी गायकवाडने पाठवलेल्या एका अन- ोळखी इसमाकडे (ज्याचा मोबाईल क्रमांक ८३२९६०८८६१ असून तो बुलेट गाडी क्र. एमएच-२०-ईएस-२०९८ वर आला होता) सोपवला होता.
फ्लॅटला सील ठोकून पैशाची मागणी
काही महिन्यांनंतर, जून २०२४ मध्ये कंपनीच्या जनरल मॅनेजरने अमिनाबी यांच्या फ्लॅटला सील ठोकले. जेव्हा अमिनाबी यांनी ९ लाखांच्या डीडीबाबत विचारणा केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. कंपनीने सांगितले की, तो डीडी आमच्या खात्यात जमा झालेला नाही आणि भारत गायकवाड याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. तुम्ही तुमचे पैसे त्याच्याकडूनच वसूल करा असे सांगितले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.