

Marathwada water crisis
छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या अन्य भागांच्या तुलनेत मराठवाडा विभागात पावसाचा जोर कमी असल्यामुळे उजनी आणि जायकवडी या धरणांमधील पाणीसाठ्यात फार मोठी वाढ झालेली दिसत नाही. मराठवाड्यात केवळ ३३.९६ टक्के उपयुक्त साठा शिल्लक असून गतवर्षीपेक्षा यंदा २१.३८ टीएमसीने जलसाठा कमी झाल्याने मराठवाड्यावर जलसंकट कायम आहे.
यंदा जून महिन्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने धरणांमध्ये अपेक्षित आवक झाली नाही. जुलैच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढत असला, तरी गतवर्षीची तूट भरून काढण्यासाठी सातत्याने दमदार पावसाची आवश्यकता आहे. सध्या मराठवाड्यात धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या ५ जुलैच्या अहवालानुसार, विभागातील ११ प्रमुख धरणांमध्ये केवळ ६१.६९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ८३.०७ टीएमसी होता. अवघ्या एका वर्षात २१.३८ टीएमसी पाण्याची घट झाली आहे.
•जायकवाडी-२१.५४
•येलदरी-८.११
•पेनगंगा-७.०६
•मनार-३.०१
•माजलगाव-०.९६
•मांजरा-०.७९
•निम्न दुधना-०.७८
•निम्न तेरणा-१.३१
•विष्णुपुरी-०,४५
•सिद्धेश्वर-0.00
•धाराशिव-१.६४
कोयनेच्या साठ्यात वाढ!
कोयना धरणातील पाणीसाठा जूनअखेर पार रसातळाला म्हणजे ८ टीएमसीपर्यंत खाली गेला होता. पण, गेल्या पाच दिवसांत कोयना धरणात १३ टीएमसीची वाढ होऊन पाणीसाठा २१ टीएमसीवर गेला आहे. कोयना, कृष्णा, वारणा आणि पंचगंगा खोऱ्यातील धोम (४.४१), कण्हेर (४.०२), बलकवडी (३.४३), उरमोडी (३.४३), तारळी (०.९२), चांदोली (१३.३६), राधानगरी (३.१२), दूधगंगा (३.४०), तुळशी (१.४७) आणि पाटगाव धरणातील पाणीसाठा १.३० टीएमसीपर्यंत वाढला आहे.
‘अलमट्टी’तही वाढ, विसर्ग सुरू
महाराष्ट्राच्या हद्दीतील राजापूर बंधाऱ्यामधून कर्नाटकातील हिप्परगी आणि अलमट्टी धरणांकडे प्रतिसेकंद ४२,६२५ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अलमट्टी धरणात जवळपास २१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अलमट्टीतूनही प्रतिसेकंद ८२२ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.