

Drizzly agricultural work accelerates in Marathwada, no sun in many areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः मराठवाड्यात शनिवारी अनेक भागांत दिवसभर संततधार आणि रिमझिम पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच आकाश ढगाळ राहिल्याने बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी दिवसभर रिमझिम सुरू राहिल्याने रस्ते ओलेचिंब झाले, तर शहरांमध्ये वाहनांची गती मंदावली. बाजारपेठांमध्येही नागरिकांची वर्दळ तुलनेने कमी दिसून आली. सततच्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंतरमशागत आणि खतांच्या फवारणीच्या कामांना सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सकाळपासूनच आभाळ दाटून आल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.
सायंकाळपर्यंत ५.४ मिमी पावसाची नोंद झाली असून वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक काहीशी मंदावली होती. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे बाजारपेठा, चौक आणि मुख्य मार्गावर वाहनांची गती कमी झाली. कार्यालयीन वेळेत अनेक ठिकाणी वाहनचालकांना संथ गतीने प्रवास करावा लागला.
गरज असेल तरच घरातून बाहेर पडा : मुख्यमंत्री
मुंबई: हवामान विभागाने सोमवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. अन्यथा, घरातच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शनिवारी ते सहकार दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. प्रशासनाने दर तीन तासांनी पावसासंदर्भातील अलर्ट जारी करण्याची व्यवस्था केल्याची माहितीही त्यांनी दिली.