

DPR of 5 thousand houses will be prepared in Sillod: MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड शहरातील एकही पात्र कुटुंब बेघर राहू नये, यासाठी नगरपरिषदेमार्फत ५ हजार घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच नोटरीधारक लाभार्थ्यांनाही घरकुल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.
सिल्लोड नगरपरिषदेत आयोजित प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना बांधकाम मंजुरी आदेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील ८० आणि रमाई आवास योजनेतील ८५ अशा एकूण १६५ लाभार्थ्यांना बांधकाम मंजुरी आदेश, तर रमाई घरकुल योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. आमदार सत्तार म्हणाले, शहरातील बेघरांचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून पात्र कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.
आवश्यकतेनुसार बँक कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करावा, तसेच नगरपरिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांनी प्लॉट नसलेल्या बेघरांना घरकुल मंजूर करण्यासाठी तसेच नोटरीधारक लाभार्थ्यांना योजनांचा लाभमिळावा, यासाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्याधिकारी अजगर पठाण उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.