सोमवारी ६६ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन
Marathwada University The 66th convocation ceremony will be held on Monday
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा दीक्षांत समारंभसोमवारी (दि.५) आयोजित करण्यात आला आहे. आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत हे दीक्षांत सोहळयाचे प्रमुख पाहुणे असून २६९ पीएच.डी स्नातकांना प्रत्यक्ष मंचावर पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शनिवारी (दि.३) पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, संचालक बी एन डोळे, डॉ. कैलास अंभुरे, डॉ संजय शिंदे, डॉ विष्णू कन्हाळे यांची उपस्थिती होती. सोमवारी सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयसरचे संचालक डॉ. सुनील भागवत उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.बी.एन.डोळे, विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. बीना हुंबे, डॉ. संजय साळुंके, डॉ. वैशाली खापर्डे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
पीएच.डी धारकांना मंचावर पदवी
यंदाच्या दीक्षांत समारंभात पीएच.डी स्नातकांना प्रत्यक्ष मंचावर पदवी प्रदान करण्यात येईल. २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या काळातील २६९ संशोधकांनाच ही संधी प्राप्त होणार आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा - १०४, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र २०, मानव्य विज्ञान ९९ तर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाख ४६ असे २६९ संशोधक आहेत. तसेच ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२४ या पदवी परीक्षेतील १२ हजार ४६५ व मार्च / एप्रिल २०२५ परीक्षेतील ५१ हजार ९४२ या दोन सत्रांतील ६४ हजार ४०७पदवीधारकांना महाविद्यालयातून पदवी मिळणार आहे. असे डॉ. डोळे यांनी सांगितले.
नोंदणी बंधनकारक
दीक्षांत समारंभात चार विद्याशाखेतील २६९ पीएच.डी स्नातकांना प्रत्यक्ष मंचावर पदवी घेण्यासाठी सोमवारी सकाळी ८ ते १० या दरम्यान नावनोंदणी करने बंधनकारक आहे. दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण यन्नावार यांनी दिली

