

राहुल बालुरे
बोरोळ : मागील दहा दिवसांपासून नदीपात्रात पुरस्थिती कायम आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून जोराचा पाऊस सुरू असल्याने मांजरावरील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे मांजरा नदीला मिळणाऱ्या २ नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होतच आहे. यामुळे बोरोळ मंडळातील ११ हजार हेक्टरवरील पिक पाण्याखाली गेली आहेत.
सलग दोन दिवस जोराचा पाऊस व मांजरा धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने देवणी तालुक्यातील बोरोळ मंडळात मांजरा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शिवारात सर्वत्र पाणी पाणी झाले आहे नदीपात्रातील वाढणाऱ्या पाण्यावर शेतकरी याकडे लक्ष ठेऊन आहेत.
दोन वर्षांपुर्वी अशाच पुरामुळे तालुक्यातील कोट्यवधी रुपये सोयाबीनच पिकांचे नुकसान झाले होते. यावर्षीही आलेल्या पुरात ११ हजार हेक्टरवरील पिके ही पाण्याखाली गेली आहेत. यात सोयाबीन, तुर, ऊस, भाजीपाला पिके आलेल्या पुरात पाण्याखाली गेली आहेत. शेतीचे अवजारे, शेती पंप मोटारी, जणावरांचा चारा, पुरात वाहून गेले आहे. अतिपावसामुळे खडी सोयाबीन नासुन गेला आहे.
शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिक गेलं आहे. तालुक्यातील लासोना , बटणपूर, शिधिकामठ, बोरोळ-शिवाजीनगर गावाचा देवणी तालुक्याशी संपर्क तुटला आहे, तर वागरी येथील देवनदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरात मागील दोन दिवसापासुन पाऊस सुरूच आहे. धरणक्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा नदीकाठ धास्तावला आहे. झपाट्याने पाण्याच्या पातळीत वाढ होतंच असल्याने नागरिकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. शिधिकामठ मांजरा नदीवरून लखनगाव जाणारा रस्ता येथील बंधारा व सिमा भागातील सोनाळ बंधारा पाण्याखाली गेला. बोरोळ-शिधिकामठ , शिवाजीनगर -बोरोळ जाणाऱ्या रस्त्यावर पंधरा फुट पाणी चढले आहे. रस्त्याचे दिड कि.मी अंतर जलमय या गावातील नागरिकांचा इतर गावांशी संपूर्ण तुटला आहे.
सन २०२५-२६ या वर्षासाठी राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ज्यासाठी केंद्र सरकारने 'Cup & Cap' (80:110) मॉडेलला मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत '1 रुपया पीक विमा' योजना बंद करण्यात आला आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी ११६० रुपये भरविले लागतील अशी योजना खरीप २०२५ आणि रब्बी २०२५-२६हंगामांसाठी लागू आली आहे. प्रमुख नवीन नियम उत्पादनावर आधारित सुधारित योजनेत पिकाच्या उत्पादनातील घट यावर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यावर्षी नुकसानभरपाई कशी मिळेल यासाठी शेतकरी संभ्रमात आहेत. हे नुकसान शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकरी हैराण... पुरामुळे जनावरांना चारा मिळणे कठीण झालं आहे. मागील 20 दिवसांपासून संततधार पाऊस मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेतात असलेला चारा पाण्यात गेला. जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही करावीच लागत आहे. दुसऱ्याच्या शेतातील चारा मागुन जनावरांना घालतो. शेतात चिखल झालाय, पाय पार गुडघ्या-मांड्यापर्यंत जात आहे.
ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शेतकरी