

Maratha Kranti Morcha insists on indefinite hunger strike at Kranti Chowk from August 9
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे व शाश्वत आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी येत्या ९ ऑगस्टपासून क्रांती चौकात बेमुदत उपोषण करण्याच्या निर्णयावर मराठा क्रांती मोर्चाने रविवारी (दि.२) पुन्हा शिक्कामोर्तब केले. सिडकोतील एन-३ येथील शिवछत्रपती महाविद्यालयात झालेल्या बैठकीत परवानगी मिळो अथवा न मिळो, नियोजित तारखेपासून आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला. तसेच मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर लागू आहे की नाही, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.
उपोषणासाठी प्रशासनाकडे १५ दिवसांपूर्वीच परवानगी मागण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील गावोगावी दौरे व बैठका घेऊन आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीत सध्या लागू असलेल्या एसईबीसी आरक्षणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घेत नसल्याने हे आरक्षण टिकणार नाही, असा दावा करण्यात आला.
गायकवाड आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने प्रलंबित क्युरेटिव्ह याचिकेतील त्रुटी दूर करून राज्य सरकारने आवश्यक पावले तातडीने उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, ९ ऑगस्टपासूनच्या बेमुदत उपोषणासाठी क्रांती चौकात परवानगी मिळावी, यासाठी सोमवारी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.
वंशावळ जुळत नसल्याने प्रमाणपत्र होताहेत रद्द
हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे काढण्यात आलेल्या २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयामुळे समाजात संभ्रम निर्माण झाल्याचा आरोपही बैठकीत करण्यात आला. या निर्णयानुसार अर्ज केलेल्या अनेकांना नोंदी व वंशावळ जुळत नसल्याच्या कारणावरून जातप्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा दावा करण्यात आला.