

Sambhajinagar Rain: City lashed by heavy rain
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी (दि.२) दुपारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. सकाळी कडक ऊन पडल्याने पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. मात्र दुपारी दोनच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आणि मुसळधार सरींनी शहराला झोडपून काढले. अधूनमधून विश्रांती घेत सुमारे दोन तास पाऊस सुरूच होता.
या पावसामुळे रविवारचा आठवडी बाजार चिखलमय झाला. तर दिवसभरात ६.७मिमी पावसाची व यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत शहरात ३५७ मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली आहे.
शहरासह परिसरात रविवारी दिवसभर ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू होता. मात्र दुपारी वातावरणात अचानक बदल झाला. ढगांची दाटी वाढल्यानंतर शहरातील विविध भागांत पावसाची सुरुवात झाली. काही ठिकाणी जोरदार, तर काही भागांत रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे प्रमुख रस्ते, चौक आणि सखल भागांतील रस्ते ओले झाले. सुटीचा दिवस असल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची काही काळ धावपळ उडाली. दुचाकीस्वारांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला, तर काही ठिकाणी वाहतुकीचाही वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दिवसभरात ६.७मिमी पावसाची नोंद
चिकलठाणा वेधशाळेत रविवारी ६.७मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान २९ अंश, किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस तर सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के नोंदविण्यात आली. पुढील काही दिवसही शहर व परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.