Mangalsutra of five women stolen from Renuka Mata temple
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : नवरात्रनिमित्त रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पाच महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. या घटना रविवारी (दि. २८) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडल्या. सुटी असल्याने अनेक महिला कुटुंबासह दर्शनासाठी आल्या होत्या. हीच संधी साधून चोरांनी हात सफाई करून पोलिसांना खुले आव्हान दिले.
फिर्यादी सरोज सिद्धेश्वर कापसे (४७, रा. हसूल) यांच्या तक्रारीनुसार, त्या पती मुलासह सिडको एन-९ भागातील रेणुकामाता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथे गोंधळाचा कार्यक्रम सुरू असल्याने ते पाहण्यासाठी गेल्यानंतर गर्दीत त्यांच्या गळ्यातील ६ ग्रॅमचे मंगळसूत्र चोराने लंपास केले.
त्याचप्रमाणे सुवर्णा रामहरी साळुंके (३४, रा. पिसादेवी रोड) यांचे अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र, प्रियंका रामेश्वर अधाने (२२, रा. पिसादेवी रोड) यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅमचे मंगळसूत्र, मीना सुदर्शन लाहिवाल (३८, रा. भक्तीनगर) यांच्या गळ्यातील ६ ग्रॅमचे मंगळसूत्र, तसेच शोभा सखाराम पांचाळ (५५, रा. शिवनेरी कॉलनी) यांच्या गळ्यातील दीड ग्रॅमचे मंगळसूत्र असा ऐवज चोराने लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार देविदास राठोड करत आहेत.
नागरिकांनी सांगितले की, रविवारी गोंधळाच्या कार्यक्रमात महिलांची मोठी गर्दी होती. त्यामुळे पुरुष महिलांमध्ये जाऊन चोरीची हिम्मत करणार नाहीत. पाचही मंगळसूत्र ओढणाऱ्या चोरांच्या टोळीतील महिलाच असतील, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
कर्णपुरा यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. तसेच सीसीटीव्ही, संशियितांची तपासणी केली जात असल्याने चोरांनी रेणुकामाता मंदिर, हरसिध्दीमाता मंदिर हसूल, सातारा व इतर भागातील देवींचे मंदिर टार्गेट केली आहेत. या ठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या आहेत.