

ST: A duty of convenience only for employees who are in the favor of the authorities
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या छत्रपती संभाजीनग विभागातील अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मर्जीतील चालक-वाहकांना त्यांच्या सोयीनुसार कार्यालयीन कामे सोपवण्यात येत आहेत. गुणवत्तेसह सेवाज्येष्ठता असलेले चालक-वाहक मात्र बसवर कर्तव्य करत असल्याने कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली आहे. याच घटनेवरून अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत वादाला तोंड फुटले आहे. याचा स्फोट होण्याआधीच प्रशासनाने गंभीरतेने घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे.
नुकतेच विभाग नियंत्रकांनी गुण-वत्ता आणि सेवाज्येष्ठता विचारात घेऊनच तातडीची गरज असेल तरच चालक-वाहकांना कार्यालयीन कामांसाठी वापरावे, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, या आदेशाकडे विविध आगारांतील अधिकारी कानाडोळा करत आपल्या मर्जीतील चालक-वाहकांना कार्यालयीन कामांसाठी वापरत असल्याची आरोप कर्मचारी संघटनांकडून होत आहे. वरिष्ठ अधिकारी केवळ कागदीघोडे नाचवत असल्याने तेही या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा जोर धरत आहे.
दरम्यान, आता गर्दीचा हंगाम सुरू आहे. अशावेळी कार्यालयीन कामांत असलेल्या चालक वाहकांना लाईनवर पाठवावे, अशीही मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे.
दररोज चालक-वाहकांना कर्तव्य देणारे अधिकारी आपल्या जवळच्या चालक-वाहकांना सोयीचे कर्तव्य देण्यात आग्रही भूमिका बजावत आहेत. यात आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही पाठिंबा असल्याची चर्चा असून, या बाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
नुकताच सिडको बसस्थानकात अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत याच कारणांतून वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अनेकदा संघटनांचे पदाधिकारी आपला माणूस सोयीच्या ठिकाणी ठेवावा यासाठी धडपडत आहेत. तर अधिकारी आपल्या मर्जीतील कर्मचारी सोयीच्या ठिकाणी असावा यासाठी धडपडत असल्याचे चित्र विभागात दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या दिवसांत हा वाद वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.