

Sambhajinagar preferred for investment: Industry Minister Samant
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्याने नवीन १२ धोरणे निश्चित केली आहेत. त्यामुळे उद्योग क्षेत्रात राज्य देशात क्रमांक १ वर असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इथे सांगितले. त्यातही छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणुकीस उद्योग जगताची पसंती असून, येथील उद्योग व संलग्न क्षेत्राच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.
शेंद्रा येथील ऑरिक सिटीचा ६ वा वर्धापन दिन व समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण सोमवारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर, सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, भास्कर मुंडे, विजय राठोड, अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे मंत्री सामंत म्हणाले ऑरिक सिटीचे यश हे त्यासाठी जमीन देणारे शेतकरी आणि त्यावर उद्योग उभारून गुंतवणूक करणारे उद्योजक या दोघांचे आहे. या वसाहतीचे आणखीन प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अतिवृष्टीमुळे औद्योगिकक्षेत्रानजीक शेती, गावांना काही समस्या निर्माण झाल्या. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना नजीकच्या काळात करण्यात येतील. असेही नमूद केले. याप्रसंगी सामंत यांच्या हस्ते ऑरिक सिटीच्या सहा वर्षांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक पी. डी. मलिकनेर यांनी केले.
संभाजीनगरात उद्योगांसाठी वर्षभरात ५ एकर भूसंपादन
छत्रपती संभाजीनगर येथे गुंतवणूकीसाठी अनेक उद्योग इच्छूक आहेत. येत्या वर्षभरात ५० हजार कोटीची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे आणखी ५ हजार एकर जागा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ऑरिक येथे पत्रकार परिषेदत दिली. ऑरीक सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त समृद्धीजोड मार्गाचे लोकार्पणानंतर उद्योग मंत्री सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. टोयोटा-किलोस्कर, अथर, जेएसडब्ल्यूसह अनेक कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. त्यांचे प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. ऑरिक येथे १ लाख कोटीची गुंतवणूक झाली आहे. आणखी उद्योग गुंतवणूकीसाठी इच्छूक असल्याने येत्या वर्षभरात ५० हजार कोटींची गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. यासाठी ऑरीकच्या पुढच्या वर्धापनदिनापर्यंत ५ एकर जमीनचे अधिग्रहण केले जाईल. असे सांगितले.
शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन
अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन पूर्णपणे आहे. उद्योग जगतानेही या आपल्या संकटात सापडलेल्या भावांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत सहयोग द्यावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.