

Maize procurement center closed, farmers in financial crisis
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या मकाला चांगला भाव मिळावा म्हणून मका खरेदी प्रक्रियेत सुरू झालेल्या विलंबामुळे तालुक्यात मकाला भाव मिळत नसून शासनाने मका पिकाला प्रतिक्विंटल २,४०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. यासाठी विना विलंब मका खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे उबाठा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील अंदाजे ५० टक्क्यांपर्यंत मका पीक शेतकऱ्यांनी घेतले होते मात्र, पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि सोगणीनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या शोषणालाही तोंड द्यावे लागत आहे. खरेदी केंद्र उघडण्यात होत असलेल्या विलंबाचा फायदा घेत व्यापारी सध्या फक्त १००० ते १२०० रुपये दराने मका खरेदी करत आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. हमीभावापेक्षा तब्बल निम्म्या दराने मका विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घुसमट वाढली आहे.
तर आंदोलन करणार
शासनाने घोषित केलेल्या हमीभावाचा लाभ आम्हाला तत्काळ मिळावा. खरेदी केंद्र सुरू न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा स्पष्ट इशारा डॉ. अण्णा शिंदे व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासकीय मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करून न्याय द्यावा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.