

Clashes between BJP-Shiv Sena candidates and workers in Sillod
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा :
नगरपरिषदेच्या निवडणुकीत एक महिला पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप उमेदवारांनी पकडून शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. तर या दरम्यान शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार कार्यकर्त्यासह पोहचल्याने त्यांच्यात व भाजप उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रभाग क्रमांक आठमधील शास्त्री कॉलनीत घडली. या प्रकरणी भाजपच्या वतीने महिलेविरोधात तक्रार देण्यात आलेली असून रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
सदर महिला गेल्या दोन तीन दिवसांपासून सव्र्व्हेच्या नावाखाली प्रभाग क्रमांक आठमधील शास्त्री कॉलनीच्या गल्लीमध्ये फिरत होत्या. सलग तिसऱ्या दिवशीही या महिला गल्लीत दिसून आल्याने भाजपचे उमेदवार कमलेश कटारिया, रेखा गणेश भूमकर, गणेश भूमकर यांना संशय आला. यामुळे एका महिलेला विचारणा करीत असताना दुसरी महिला पसार झाल्याने संशय बळावला. त्यात महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने भाजपच्या उमेदवारांनी पोलिसांना माहिती दिली. तातडीने पोलिस निरीक्षक शेषराव उदार घटनास्थळी दाखल झाले. तर या दरम्यान शिव-सेनेचे उमेदवार विशाल जाधव देखील कार्यकर्त्यासह दाखल झाले. महिला पैसे वाटप करीत असल्याचा आरोप भाजप उमेदवारांनी पोलिसांकडे केला. यामुळे दोन्हीं गटात चांगलाच राडा झाला. तर दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जात धक्काबुक्की केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी आक्रमक होत दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना बाजूला करीत वाद मिटवला.
दरम्यान, सदर महिलेसह पसार झालेली महिला अशा दोघी जणी गेल्या दोन तीन दिवसांपासून सव्र्व्हेच्या नावाखाली प्रभाग क्रमांक आठमधील शास्त्री कॉलनीच्या गल्लीमध्ये फिरत होत्या. त्यांच्याकडे शिवसेना पक्षाचा रुमाल मिळून आला, असा दावाही भाजपचे उमेदवारांनी केला आहे. तर महिलेला विचारणा केली असता मी घाटीत (सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात) काम करते असे उत्तर दिले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नगरपरिषद निवडणुकीत शिव-सेनेकडून पैसे वाटून प्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तक्रारीत तथ्य नसल्याचा पोलिसांचा दावा
पैसे वाटप प्रकरणातील महिलेला चौकशीसाठी बोलावले असता ती आशा स्वयंसेविका असून ती शासकीय कामावर असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशी माहिती पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. त्यामुळे तिची चौकशी पूर्ण करून तिला सोडून देण्यात आल्याचे उदार यांनी स्पष्ट केले.
निवडणूक विभागाकडेही तक्रार
दरम्यान या घटनेची भाजपने पोलिसांसह निवडणूक निर्वाचन अधिकारी नीलेश अपार यांच्याकडेही तक्रार केली. तक्रारीची दखल घेत त्यांनी तातडीने पथक पाठवून या प्रकरणाची चौकशी देखील केली आहे. चौकशीचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली. तर शुक्रवारी (दि. २८) रात्रीही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचे बॅनर फाडण्याची घटना घडली. या घटनेमुळे महाविकास आघाडीतील पक्षांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले होते असून शहरात दबाव तंत्रांचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.