

Mahavitaran's shock to the city's water supply
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीसोबतच नवीन ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा वीजपुरवठा तब्बल १२ तास २० मिनिटे बंद राहिला. त्यामुळे ढोरकीन पंपगृह येथून या दोन्ही जलवाहिनीचा शहराच्या दिशेने होणार पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाल्याने शनिवारी (दि. २५) जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे अनेक वसाहतींतील पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ महापालिकेवर आली.
ऐन दिवाळीत जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा थोड्याप्रमाणात विस्कळीत झाला होता. परंतु, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून पाणीपुरवठा सुरू केला. तर शुक्रवारी भाऊबीजेच्या दुसर्याच दिवशी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला.
ढोरकीनहून शहराच्या दिशेने होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सायंकाळी ४.१६ वाजेच्या सुमारास अचानक बंद झाला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तपासणी केली असता वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद झाल्याची माहिती पुढे आली. त्यावर महावितरणाला माहिती देण्यात आली. तर महाविरतणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीवर पेट्रोलिंग केली.
अनेकवेळा वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु, पुरवठा स्थिर न राहिल्याने पुन्हा तपासणी केली असता एका खांबावरील वाय कंडक्टर तुटल्याचे अढळले. त्यांनी तातडीने कंडक्टरची दुरुस्ती करून चाचणी घेतली. मात्र, त्यावरही वीज पुरवठा सुरू झाला नाही. पुन्हा तपासणी केल्यानंतर इन्सुलेटर नादुरुस्त झाल्याचे अढळले. हे इन्सुलेटरही बदलण्यात आले. हे काम पूर्ण होईपर्यंत तब्बल १२ तास २० मिनिटांचा अवधी लागला. पहाटे ४. ३५ वाजता या दोन्ही जलवाहिन्यांतून शहराच्या दिशेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. या साडेबारा तासांच्या खंडामुळे जुन्या शहरातील पाण्याचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ महापालिकेवर आली.