

Shirsat father and son attacked on Tupe brothers with a sword
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पाळीव कुत्रे जोरजोरात भुंकत असल्याने किनारे नीट ठेवायला सांगितल्याच्या कारणावरून तिघा बाप-लेकांनी भावंडांवर तलवारीने जीवघेणा हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास शताब्दीनगर भागात घडली.
संजय शिरसाठ, आनंद शिरसाठ आणि चेतन शिरसाठ (रा. शत-ाब्दीनगर, एन-१२) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रोहित राजेंद्र तुपे (३६, रा. शताब्दीनगर) हे रिक्षाचालक आहेत. त्यांनी रात्री दहाच्या सुमारास चर्चजवळ रिक्षा उभी केली. पायी घराकडे जात असताना आरोपी संजय शिरसाठ याने पाळलेले कुत्रे जोरजोरात भुंकू लागले. त्यामुळे तुपे यांनी शिरसाठला कुत्रे नीट ठेवायला सांगितले.
त्यावरून शिरसाठ याने तू काय कुठला दादा आहेस का? तू खूप माजलास का? असे म्हणत मारहाण सुरू केली. त्याचा मुलगा आनंद आणि चेतन यांनीही रोहित याना मारहाण केली. काही वेळाने रोहित यांचा लहान भाऊ अक्षय तुपे त्यांच्याकडे आला. त्यांनी घडलेला प्रकार सांगताच दोघे पुन्हा शिरसाठच्या घराकडे विचारण्यासाठी गेले. जाब तेव्हा संजय शिरसाठसह त्याच्या दोन्ही मुलांनी तलवार, चाकूने तुपे बंधूंवर हल्ला चढविला.
रोहित यांच्या डोक्यात तलवारीने वार करण्यात आला. त्यानंतर पोटात संजय चाकू खुपसू लागला, तो वार रोहित यांनी चुकविला. त्यानंतर अक्षयलाही तिघांनी हत्याराने मारहाण करून जखमी केले. गोंधळ पाहून लोक धावत आले. त्यानंतर तुपे बंधू सिटी चौक पोलिस ठाण्यात गेले. याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शिरसाठ बाप-लेकांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करत आहेत.