

Local Crime Branch raids gambling den under a neem tree in the Chikalthana area
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली रात्रीच्या अंधारात चार्जिंगच्या लाईटवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत तब्बल १४ जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह ५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी गुरुवारी (दि.१) दिली.
अधिक माहितीनुसार, चिकलठाणा शिवारातील गणेश गाजरे यांच्या शेतात काही जण रात्रीच्या वेळी तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या आधारे बुधवारी (दि. ३०) रात्री ११ वाजेच्या सुमारास गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी या शेतात छापा मारला. त्यावेळी लिंबाच्या झाडाखाली चार्जिंगची लाईट लावून १४ जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सर्वांना जागीच पकडून त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य आणि ५ लाख ३३ हजार ६०० रुपये रोख रक्कम आढळून आली. हा जुगार अड्डा सिद्धार्थ मगरे (रा. सिंदिबन) हा चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहाय्यक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार राजेंद्र साळुंके, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, संतोष पारधे, संदीप तायडे, मनोहर गिते, विक्रम खंडागळे, विजय निकम, मनोहर त्रिभुवन, मनोज विखनकर यांच्या पथकाने केली.
अशी आहेत जुगाऱ्यांची नावे
जुगार अड्डा चालक सिद्धार्थ मगरे, शिवनाथ गोल्हारे, शेख फिरोज, रामेश्वर गाडेकर, वसीम कुरेशी, अफरोज कुरेशी, गणेश वडेकर, कैलास बकाल (सातही रा. चिकलठाणा), विक्रांत जगताप, ओमकार शिंदे (दोघे रा. संजयनगर, मुकुंदवाडी), महेमुद पठाण (रा. नारेगाव), अजय जाधव (रा. सिंदिबन), गौतम मगरे, किशोर मगरे, अशोक बोंडे (तिघे रा. ब्रिजवाडी)