

Flying school work at airport in final stage; Classes start from December
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : येथील चिकलठाणा विमानतळावरून आता वैमानिकांची नवी पिढी आकाशाला गवसणी घालण्यासाठी सज्ज होणार आहे. डी. वाय. पाटील एव्हिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्लाइंग स्कूल सुरू केले जात असून, या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून येथे वैमानिक प्रशिक्षणाच्या (पायलट) प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशात वेगाने विस्तारणाऱ्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात कुशल वैमानिकांची मोठी गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू होणारे हे फ्लाइंग स्कूल पायलट प्रशिक्षणार्थीसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. फ्लाइंग स्कूलसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी वेगाने केली जात आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक विमाने, फ्लाइट सिम्युलेटर आणि इतर तांत्रिक सामग्री लवकरच विमानतळावर दाखल होणार आहे.
दरवर्षी २०० व्यावसायिक पायलट घडणार
या स्कूलमधून वर्षाला सुमारे २०० विद्यार्थ्यांना कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उड्डाणाचे परिपूर्ण प्रशिक्षण येथे दिले जाईल. यामुळे मराठवाड्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना थेट आपल्या भागात जागतिक दर्जाचे वैमानिक प्रशिक्षण घेण्याची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ
चिकलठाणा विमानतळावर नियमित व्यावसायिक विमानांसोबतच आता प्रशिक्षणार्थी विमानांचीही वर्दळ सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे येथील विमानतळाची उपयुक्तता वाढणार असून, एव्हिएशन क्षेत्राशी संबंधित पूरक उद्योग, रोजगार आणि शैक्षणिक संधींना शहरात मोठी गती मिळणार आहे. डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या बॅचकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.