

Loans worth over Rs 60 lakhs disbursed on the spot in 4 hours
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी बँक व्यवस्थापनामार्फत अर्ज द्या कर्ज घ्या ही मोहीम राबविली जात आहे. याअंतर्गत शनिवारी (दि.५) बाजार सावंगी येथे शिबिरात चार तासांतच विविध बँकांकडून ६० लाखांहून अधिकचे कर्ज मंजूर करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांना विमा सुरक्षा कवचही काढून देण्यात आले.
शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी आणि पीक कर्जाचे नूतनीकरणासाठी ३ ते १० जुलै दरम्यान बँक अधिकारी, महसूल, ग्रामविकास आणि कृषी सहायक गावांमध्ये मोहीम राबवली जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर होत आहे. शनिवारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बाजार सावंगी येथे अर्ज द्या कर्ज घ्या शिबीर घेण्यात आले.
यात विविध बँकांकडून नवीन कर्ज, पीक कर्जाचे नूतनीकरण, नारी शक्ती कर्ज असे ६० लाखांहून अधिकचे कर्ज वाटप करण्यात आले. तसेच अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती बिमा, सुरक्षा बिमा योजनेची अनेक प्रकरणे जागेवरच मंजुरी केली. बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक विवेक नाचणे यांनी शेतकऱ्यांना नवी कर्ज तसेच पीक कर्ज नूतनीकरण केले तर काय फायदा होतो. याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा अग्रणी व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी अटल पेन्शन योजना, सुरक्षा बिमा योजना, जीवन ज्योती विमायोजना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अप्पाराव नलवडे, शाखा व्यवस्थापक योगेश खैरनार, ग्रामविस्तार अधिकारी बनसोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.