

Life-threatening reel of young people getting into water
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील १४ वॉर्डाना पाणीपुरवठा करणाऱ्या हसूल तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या तलावाच्या चारही बाजूंनी सुरक्षारक्षक नियुक्त करून तलावाकडे जाण्यास बंदी घातली होती. मात्र असे असतानाही महाविद्यालयीन तरुण पाण्यात उतरून जीवघेणी रील तयार करीत आहेत. त्यामुळे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा झोपेत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील हसूल तलावाच्या सुरक्षेची नेहमीच वॉवाबोंब असते. या तलावात पोहण्यासाठी अनेक जण येत असतात. यात बुडून मरण पावण्याची घटनाही सतत घडत असते. एवढेच नव्हे तर हर्मूल तलावात मागील काही दिवसांत अनेकांनी आत्महत्याही केल्या आहेत. या घटनानंतर लगेच महापालिका तलावालगत सुरक्षारक्षक नियुक्त करून तलावाजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली.
मात्र महिना दीड महिन्यानंतर पुन्हा जैसे थे प्रकार सुरू होतात. सध्या तोच प्रकार या तलावात सुरू आहे. हर्मूल तलावात गावाच्या बाजूने अनेक जण पोहण्यासाठी येतात. तर मागील काही दिवसांपासून महाविद्यालयीन तरुण तलावाच्या पाण्यात उतरून व्हिडिओ रील करीत आहेत. हा प्रकार जीवघेणा असून, पाण्यात उतरल्यानंतर पाय घसरून पडल्यास रील करणे जीवावर बेतू शकते, असा धोका असतानाही तरुण सर्रास रील तयार करीत असून, महापालिकेची सुरक्षा यंत्रणा झोपेत आहे.
पावसाळ्यात महापालिकेने हर्मूल तलावाच्या सुरक्षेत आणखीच वाढ करणे गरजेचे आहे. परंतु असे असतानाही सुरक्षाच काय तर तलावालगत आपत्ती व्यवस्थापनाबाबतही कुठलीच यंत्रणा सज्ज ठेवलेली नाही. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानाच्या दुर्घटनेत जसा निष्काळजीपणा केला, तसाच हसूल तलावाच्या सुरक्षेबाबतही सुरू असल्याचे दिसत आहे.