

Leopard in front of a bike in Ajanta Ghats
अजिंठा, पुढारी वृत्तसेवा अजिंठा घाटात शुक्रवारी सकाळी घडलेली एक धडकी भरवणारी घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली. घाटातून दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या दोघा भावंडांसमोर अचानक बिबट्या आल्याने क्षणात घबराट निर्माण झाली. मात्र, प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ टळला.
अजिंठा गावातील रहिवासी इसाक खान आणि मोहम्मद खान ही भावंडे सकाळी साडेआठ वाजता दररोज प्रमाणे अजिंठा लेणी जवळील टी-जंक्शन शॉपिंग प्लाझाकडे दुचाकीने निघाले होते. घाटाच्या मध्यभागी असलेल्या दर्गा जवळील नालीतून अचानक एक बिबट्या बाहेर आला व त्यांच्या समोरून रस्ता ओलांडून गेला.
ही घटना इतकी अचानक घडली की काही क्षणांसाठी ते दोघे अत्यंत भयभीत झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी दुचाकी थांबवल्यामुळे मोठा अपघात आणि जीवितहानी टळली. या घटनेनंतर घाटातून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही याच परिसरात टी जंक्शन शॉपिंग प्लाझा येथील दोन व्यावसायिकांना सायंकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना घडली होती. तसेच काही दुचाकीस्वारांना अस्वल दिसल्याचेही सांगण्यात येत आहे. यावरून घाट परिसरात वन्य प्राण्यांची हालचाल वाढत असल्याचे स्पष्ट होते.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली असून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी अशा वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.