

The investigation into the agricultural shopkeeper is still ongoing
वाळूज, पुढारी वृत्तसेवा दहेगाव बंगला येथील संबंधित कृषी सेवा केंद्राच्या चौकशीचा सहावा दिवस उलटला. मात्र अद्यापही चौकशी सुरूच असून यामध्ये गुप्तता बाळगण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करुन अधिकाऱ्यांच्या तपासावर नागरिकांमधून शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान कृषी विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन दोषीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी शेतकरी वगातूंतून होत आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शेंदुरवादा भागात रविवारी केलेल्या दौऱ्यात कृषी केंद्र चालकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचला होता. त्यात पावती न देणे, मागणी केलेले खत, बियाणे न देता कोण-तेही माथी मारणे आदीचा समावेश होता. त्यामुळे दानवे यांनी संबंधित दुकानचालकास जाब विचारून सबंधित कृषी अधिकाऱ्याचीही कानउघाडणी केली होती. त्यानंतर तालुका कृषी विभागाने त्या दुकानवर जाऊन तपासणी केली होती. तसेच पुन्हा दुसऱ्या दिवशी सोमवारी जि.प.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही संबंधित दुकानात जाऊन झाडाझडती घेतली. त्यात दुकानतील स्टॉक, खरेदी-विक्री, बिलबुकाप्रमाणे शेतकऱ्यांचे जबाब आदींचा समावेश होता.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल तयार केला आहे. परंतु चौकशीच्या अहवालात नमूद केलेली माहिती देण्यात फारच गुप्तता बाळगली जात आहे. याचे कोडे अद्यापही समजून येत नाही. चौकशी अहवालात दडलयं काय? या प्रश्नाच्या चर्चेला वाळूज भागात उधाण आले आहे. चौकशीचा आज सहावा दिवस उलटला तरीही चौकशी सुरूच असल्याने शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. चौकशी निपक्षपातीपणे होते की दुकानदाराच्या बाजूचा अहवाल तयार होतो असा संशय शेतकऱ्यांनी बोलून दाखविला आहे. धिम्या गतीने चौकशी सुरू ठेवण्याचे गौडबंगाल उलगडणार तरी कधी? त्यामुळे चौकशीचा हा केवळ फार्स ठरतोय की काय अशीही शंका व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे वाळूजलाही सदरची मोहीम सुरू करण्याची मागणी या निमित्ताने शेतकऱ्यांतून होत आहे.
या विषयी दै. पुढारीने सोमवारच्या अंकात विरोधी पक्ष नेत्याने कान टोचताच कृषी विभागाची पळापळ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करून कृषी सेवा केंद्र दुकानदारांची बनवेगीरी उघड केली होती. याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी पुढारीचे आभार व्यक्त केले आहेत.