

Stormy rain wreaks havoc; Banana orchards in Kasarpadli area razed to the ground
खादगाव, पुढारी वृत्तसेवा :
पैठण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कासारपाडळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. सध्या फळध-ारणेच्या अवस्थेत असलेली अनेक झाडे कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती केली होती. त्यामुळे त्यांच्यासमोर आता मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
बुधवार आणि गुरुवार दि. ११ व १२ जून या दोन दिवसांदरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यांनी झोडपून काढल्याने संपूर्ण बागा मुळासकट उखडून पडलेल्या दिसून येत आहे. झाडांवर लागलेली फळे विक्रीसाठी तयार होती. मात्र झाडे कोसळल्यामुळे ही फळे मातीमोल झाली आहेत. काही ठिकाणी झाडांची मुळे उखडली असून, काही झाडांची खोडे तुटली आहेत. विशेषतः आतापर्यंत लाखो रुपये खर्च केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
स्थानिक शेतकरी दत्ता लिपाणे, राधाकिसन लिपाणे, अप्पासाहेब लिपाणे, भाऊसाहेब गोर्डे आदींच्या केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. त्यांच्या एका एकरात सुमारे २०० ते २५० झाडे कोसळली असून, एका झाडाला सरासरी ५०० रुपयांप्रमाणे नुकसान गृहीत धरले, तर प्रत्यक्षात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समोर येत आहे.
हे या वादळी पावसामुळे परिसरातील केवळ केळी नव्हे तर इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांनी नुकतीच दुसऱ्या हंगामासाठी लागवड केली होती, ती देखील वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.