

Leakage occurs in 2000 mm water pipeline during testing in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी सुरू असतांना रविवारी (दि. २२) मुकुंदवाडी परिसरात मोठी गळती सुरू झाली. त्यातून पाण्याचे उंच फवारे सुरू झाल्याने चौकासह परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. याबाबत माहिती मिळताच तातडीने पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जीव्हीपीआर कंपनीकडून नवीन जलयोजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत दिवाळीपूर्वी १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून तिची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या जलवाहिनीतून पाणीपुरवठाही सुरू करण्यात आला आहे.
पुढील टप्प्यात जालना रोडलगत म्हाडा कॉलनी ते मुकुंदवाडी, रामनगर आणि चिकलठाणा परिसरापर्यंत टाकण्यात आलेल्या २ हजार मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी शनिवारपासून सुरू करण्यात आली होती. त्यासाठी जलवाहिनीत पाणी सोडून त्यास आवश्यकतेनुसार दाब देण्यात येत आहे.
याच चाचणीवेळी रविवारी मुकुंदवाडी चौकात अचानक जलवाहिनीला गळती लागली. पाण्याचे उंच फवारे उडाले, रस्त्यावर सर्वत्र पाणी वाहत राहिले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी बॅरिकेड्स लावले.
दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाणी बंद केले. वेळेत कामगार आणि तांत्रिक यंत्रणा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सोमवारी सकाळीच दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती माहिती महापालिकेचे कार्यकारी अभियंता डी. पी. गायकवाड यांनी दिली.