

Leaf fall begins in Gautala Sanctuary
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गौताळा अभयारण्यात सध्या पानगळ सुरू असून संपूर्ण जंगलात ऋतुबदलाची जिवंत अनुभूती पाहायला मिळत आहे, हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागल्याने झाडांवरील जुनी पाने गळू लागली आहेत. साग, धावडा, मोहा, ऐन, तेंदू यांसारख्या वृक्षांच्या पानांनी जमिनीवर सोनेरी चादर पसरल्यासारखे दृश्य निर्माण झाले आहे. सकाळी व संध्याकाळी सूर्यकिरण पानगळलेल्या झाडांतून जमिनीवर पडताना जंगलात वेगळीच शोभा निर्माण करतात.
या पानगळीतूनच नव्या जीवनाची सुरुवात होते. झाडे आपली जुनी पाने टाकून नव्या पालवीसाठी सज्ज होतात. यामुळे जंगलात येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा वेगळा रंग अनुभवता येत आहे. पानगळेमुळे जमिनीवर कोरडी पाने साचल्याने वनविभागाने आग प्रतिबंधासाठी विशेष दक्षता घेत आहे. गौतळा अभयारण्यात हा बदल निसर्गाच्या ऋतूचक्राची आठवण करून देतो. निसर्गाच्या या शांत, पण अर्थपूर्ण परिवर्तनाने परिसरात एक वेगळीच मोहकता निर्माण झाली आहे.
सध्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर पानगळ सुरू असल्याने अनेक वृक्षांची घनदाट सावली कमी झाली आहे. परिणामी उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी वन्यप्राण्यांना नव्या सावलीच्या ठिकाणांचा शोध घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांच्या हालचालींमध्ये बदल दिसून येत असून काही प्राणी पाणवठे, दाट झाडी व मानवी वस्तीच्या जवळच्या भागात येताना आढळत आहेत.
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जंगलातील तापमान वाढत आहे. पानगळ झाल्यामुळे जमिनीवर थेट सूर्यकिरण पडत असल्याने उष्णता अधिक जाणवते. याचा परिणाम हरिण, रानडुक्कर, ससे, माकडे यांसारख्या प्राण्यांवर होत आहे. सावलीच्या शोधात हे प्राणी दिवसभरात अधिक हालचाल करत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.
वनविभागाचे कर्मचारी व मजूर यांच्या मदतीनेजाळपट्टे तयार करण्याची कामे केली जात असून स्थानिक ग्रामस्थांनाही याबाबत जागरूक करण्यात येत आहे. नागरिकांनी जंगलात सिगारेट, काड्या, जळते पदार्थ टाकू नयेत, तसेच आग दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.