

BJP candidates hold election rally in Ganori; direct interaction with voters
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणोरी जिल्हा परिषद गटाचे भाजप उमेदवार निखिल कल्याणराव चव्हाण व गणोरी पंचायत समिती गणाचे उमेदवार बाळासाहेब तांदळे यांनी गणोरी गावात गुरुवारी (दि.पाच) प्रचार रॅली काढून मतदारांशी थेट संपर्क साधला. या रॅलीद्वारे गावातील नागरिकांशी संवाद साधला.
प्रचार रॅलीदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी चर्चा केली. परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, शेतकरी, युवक व महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत आगामी काळात गणोरी परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जनतेचा विश्वास हेच आमचे खरे भांडवल असून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उमेदवारांनी सांगितले. रॅलीदरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांनी प्रचारात सहभाग घेतला. गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिलांनीही उमेदवारांशी संवाद साधत विविध प्रश्न मांडले.
त्यावर उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार रॅलीमुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा थेट जनसंपर्क अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसून आले.