

छत्रपती संभाजीनगर : महाराणा एजन्सीकडून महापालिकेत कंत्राटीतत्वावर कार्यरत असलेल्या एका कर्मचार्याने तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी पत्नीसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी (दि.७) सायंकाळी नारळीबाग येथील महाराणा एजन्-सीच्या कार्यालयात घडला. आताच माझा संपूर्ण पगार करा, असेही तो कर्मचारी म्हणाला. परंत कंत्राटदाराने समजूत काढल्याने अनर्थ टळला.
महापालिकेला सर्वाधिक कंत्राटी कामगार पुरविण्याचे कंत्राट महाराणा एजन्सीकडेच होते. त्यांच्याकडे तब्बल दोन हजार कर्मचारी होते. परंतु, पगार वेळेवर करीत नाही, किमान वेतन कायद्यानुसार वेतन होत नाही, पीएफ, ईएसआयसीचे पैसे कंत्राटदार भरणा करीत नाही. यासह विविध तक्रारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या. या तक्रारीनंतर प्रशासकांनी एक-एक कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत तक्रारी ऐकूण घेतल्या. त्यावरुन प्रशासकांनी महाराणा एजन्सीचे कंत्राट स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर तडकाफडकी प्रशासकांनी महाराणा एजन्सीकडील १६०५ कर्मचारी अशोका आणि गॅलेक्सी या दोन एजन्सींकडे वर्ग केले.
दरम्यान, त्यानंतर थकीत पगारीच्या बिलावरुन महाराणा एजन्सी आणि महापालिका प्रशासन यांच्यात लेटरवॉर सुरू झाले. मात्र, यात शेकडो कंत्राटी कामगारांवर आता पगारीविना उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे हे कर्मचारी आता टोकाची भूमिका घेत आहेत. असाच प्रकार मंगळवारी नारळीबाग येथील महाराणा एजन्सीच्या कार्यालयात घडला.
तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कर्मचार्याने पत्नीसह एजन्सीचे कार्यालय गाठले. कार्यालयात येताच त्या कर्मचाऱ्याने आताच माझे पगार करा नसता मी इथेच पत्नीसह जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करतो, असे म्हणत त्याच्या पत्नीने हातातील बॉटलमध्ये असलेले पेट्रोल अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यास रोखले. त्यानंतर कंत्राटदाराने समजूत काढल्याने घटना टळली.
हे आमच्याविरोधात षडयंत्र - सिद्धार्थ उद्यानातून ठरवून या कर्मचाऱ्याला महाराणा एजन्सीच्या कार्यालयात पेट्रोलची बॉटल घेऊन पाठविण्यात आले होते. ज्यांनी हा प्रकार घडवून आणला. त्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे फुटेज बुधवारी व्हायरल करणार आहोत. तसेच त्या कर्मचाऱ्याचे जेवढे वेतन महापालिकेने अदा केले, ते सर्व एजन्सीने यापूर्वीच अदा केले आहे.
विश्वनाथ राजपूत, कंत्राटदार, महाराणा एजन्सी