

Kite flying with Manja, drone monitoring of the old city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्राणघातक ठरलेल्या नायलॉन मांजाचा वापर करून पतंगबाजी करणाऱ्या आणि मांजा विकणाऱ्या विरोधात शहर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या आठ दिवसांत बारा विक्रेत्यांवर कारवाई केल्यानंतर रविवारी (दि.१४) जुन्या शहरातील जिन्सी, राजाबाजार, सिटी चौक, राजाबाजार आदी ठिकाणी ड्रो-नद्वारे इमारतींवर पाळत ठेवण्यात आली. मांजा विक्रेत्यांचा शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे.
शहरातील नायलॉन मांजा हद्दपार करण्यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हे शाखेसह सर्व ठाणेदारांना, विशेष पथकांना गस्त घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनजागृतीसाठी जुन्या शहरातील महत्त्वाचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना बोलावून त्यांची मदत घेतली जाणार आहे.
मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितास धोका टाळण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या वतीने मांजा विक्रेत्यांच्या शोधासाठी पथके कार्यरत आहेत.
सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्यावतीने ड्रोनद्वारे गोकुळ कुत्तरवाडे यांचे पथक आकाशातून मांजा शोधासाठी, जनजागृतीसाठी गस्त घालत आहे. दुसरीकडे शहर सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या वतीने शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.