

कन्नड : शनिवारी (दि.१२) तालुक्यातील सिरजगाव शिवारातील शेतात पाऊणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांकडून कोयत्याने डोक्यावर वार करून एका इसमाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७, रा. सिरजगाव ता. कन्नड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू चुंगडे हे सकाळी आपल्या गट नंबर २८ मधील जैतापूर ते सिरजगाव रोडवरील शेतात गेले होते. यावेळी राजू चुंगडे हे एकटेच असताना अचानक दुचाकीवरून दोन पुरुष व एक महिला तिथे आले. त्यांनी गाडीवरून उतरून राजू यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी राजू चुंगडे यांनी डोक्यावर होत असलेले वार हातावर झेलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या एका हाताची बोटे तुटून जमीनवर पडली तर डोक्यात जोरादर प्रहार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
यावेळी त्यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्याने शेतात खत टाकणारे मजूर धावत आले. त्यांना तोंडाला रुमाल बांधलेले हल्लेखोर पसार होताना दिसले. डोक्यात जबर वार झाल्याने राजू चुंगडे जागीच गतप्राण झाले असल्याची माहिती गावकऱ्यानी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर आरोपींना अटक करा मगच प्रेताचे शवविच्छेदन करा म्हणून नातेवाईक संताप व्यक्त करत होते.