

Kharif acreage in Marathwada has decreased by 2 lakh hectares
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीचा वेग समाधानकारक असला, तरी पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत पेरणी क्षेत्र अद्याप कमी आहे. २० ऑगस्टअखेर विभागात एकूण ४६ लाख ९ हजार ७५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. हे पाच वर्षांच्या सरासरी क्षेत्राच्या ९३ टक्केच आहे, तर गतवर्षी याच कालावधीतील पेरणीच्या तुलनेत २६ टक्के म्हणजेच २ लाख ९ हजार हेक्टरने पेरणीचे क्षेत्र घटले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत १९ लाख ८३ हजार ३३७ हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ९३ टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ३७ हजार ७० हेक्टरवर पेरणी झाली तर जालन्यात ५ लाख ८४ हजार ९१० हेक्टरवर आणि बीडमध्ये ७ लाख ६१ हजार ३५८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत २४ टक्के पेरणी झाली असून, गतवर्षाच्या तुलनेत यंदा पेरणी १०१ टक्क्यांवर पोहोचली आहे.
लातूर विभागात २६ लाख २५ हजार ७३८ हेक्टरवर पेरणी झाली आहे, सरासरीनुसार हे पेरणी क्षेत्र ९३ टक्के आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक २७ तर हिंगोलीत सर्वात कमी ८१ टक्के पेरणी झाली आहे. धाराशिवमध्ये सरासरीच्या ९५, लातूरमध्ये ९४ आणि परभणीत ९३ टक्के पेरणी झाली आहे.
गतवर्षाच्या तुलनेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ९६ टक्के पेरणी झाली आहे. परंतु, पाच वर्षांच्या सरासरी पेरणीचा अंदाज घेतल्यास यंदाची खरिपाची पेरणी ७ टक्क्यांची तूट आहे. आगामी काळातील पावसावर उर्वरित पेरणीचे चित्र अवलंबून राहणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहे.
गावनिहाय अहवाल
यंदा कृषी विभागाने गावनिहाय पेरणी अहवाल तयार केला आहे. प्रत्येकांना महाकृषीॲप या सिस्टीमचा वापर करून स्मार्ट वर्कवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार खरीप पेरणीबाबत मोहीम घेणे आणि पिकांची दैनंदिनी नोंद घेण्याचे काम झाले. त्यामुळे यंदा अतिशय तंतोतंत पेरणी अहवाल कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यात नियमित भाजीपाला पेरणी आणि इतर पेरण्यांचे क्षेत्राचा समावेश येत्या अहवालात होणार आहे.