

Kannada: Spontaneous response from young voters
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट व सोळा पंचायत समिती सदस्यांच्या निवडीसाठी ३१७ मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान संपेपर्यंत तालुक्यात जवळपास ६९ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वडगाव (जाधव) येथील मतदान केंद्रावर सकाळी दिलेले मतदान यंत्र सुरू न झाल्याने निवडणूक प्रशासनाने तत्काळ नवीन ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिले. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची ये-जा सुरू होती. विशेषतः दुपारी साडेतीन वाजेनंतर मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने अनेक केंद्रांवर रांगा लागल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित असली, तरी त्या वेळेपर्यंत शेकडो मतदार रांगेत असल्यामुळे अनेक ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आले.
औराळा, देवगाव रंगारी, हतनूर, करंजखेडा, चिंचोली लिंबाजी येथील मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत, तर काही ठिकाणी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. जेहूरङ्गुऔराळा गट-गण राखीव झाल्यामुळे या गटात मतदानाचा टक्का तुलनेने घसरल्याचे चित्र दिसून आले.
बहुतांश मतदान केंद्रांवर तरुण मतदारांची उपस्थिती लक्षणीय होती. हतनूर येथील एका मतदान केंद्रावर एका नव मतदाराचे नाव व मतदान क्रमांक मतदान पोर्टल व ऑनलाईन मतदार यादीत होता; मात्र प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील छापील यादीत नाव नसल्याने वसुंधरा काळे या नव मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागले.
कविटखेडा येथे पोलिंग एजंटला मारहाण
औराळा पंचायत समिती गणातील कविटखेडा येथे एका राजकीय पोलिंग एजंटच्या घरावर निवडणुकीच्या वादातून काही अज्ञातांनी हल्ला करत पती-पत्नीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. ७) सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडला. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.