

After the scheduled time ends, voters are given tokens to allow them to cast their votes
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या ३ गट व पंचायत समितीच्या ६ गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे ७७.८० टक्के मतदानाची नोंद झाली. शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर आता सर्वांचे लक्ष ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.
तालुक्यातील या निवडणुकीसाठी एकूण ८५ हजार ३०७ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ४४ हजार ४५३ पुरुष, ४० हजार ८२५ महिला व १ इतर मतदारांचा समावेश होता. यापैकी एकूण ८५ हजार ३०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला यात पुरुषांनी ३५, २६५ तर ३१,११६ महिलांनी मतदानाचा हक्क बाजवला. मतदानासाठी तालुक्यात एकूण १०४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळपासूनच काही केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीच्या काही तासांत मतदानाचा वेग समाधानकारक होता; मात्र दुपारनंतर काही काळ मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारी सुमारे एक तास गल्ले बोरगाव येथील मतदान केंद्रावर तीन मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती करून मतदान पुन्हा सुरळीत सुरू केले.
दरम्यान, दुपारी चार वाजेपर्यंत तालुक्यात सुमारे ४७टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र सायंकाळी पाचनंतर चित्र बदलले. दिवस मावळतीकडे झुकत असताना मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडू लागले. मतदानाची वेळ संपण्याच्या सुमारास अनेक केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. तालुक्यात मतदानावेळी चोख पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता.
सुलिभंजन येथील मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा
विशेषतः वेरूळ येथील मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्याच्या दिसून आले तसेच कनकशीळ, लोणी, टाकळी आणि सुलिभंजन येथील मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुलिभंजन येथे मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन देऊन मतदानाची संधी देण्यात आली.